Ad will apear here
Next
माझे ‘नाट्य-चित्र’मय जग
ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज लिहीत आहेत नाटक आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाबद्दलच्या आठवणी...
.........
माझं लहानपण कथा-कीर्तन-प्रवचनं ऐकण्यात गेलं. त्यामुळे उत्तम संस्कार झाले. पुढे नाटक-सिनेमाची आवड निर्माण झाली. पुण्यात भरत नाट्य मंदिरासमोर राहत असल्यामुळे तिथे भरपूर नाटकं, राज्य नाट्य स्पर्धा, संगीताचे कार्यक्रम पाहता-ऐकता आले. आपणही, निदान नाटकात तरी अभिनय करावा, असं वाटू लागलं. आमची शाळा पेरुगेट भावेस्कूल. तिथे इयत्ता सहावी ते दहावी, स्नेहसंमेलनातील एकांकिकांमध्ये लहान-मोठ्या भूमिका करायला मिळाल्या. पुढे एम. ई. एस. कॉलेज. तिथे तर धमालच उडवली. सुरुवातीला या नाट्य जीवनाबद्दलच्या आठवणी पाहू.

शाळेत शाळिग्राम नावाचे एक गुरुजी होते. ते मराठी शिकवायचे; नाटक-सिनेमात काम करायचे. ‘नाच रे मोरा’ फेम ‘देवबाप्पा’मध्ये त्यांनी पोस्टमास्तरची भूमिका केली होती. ते विद्यार्थ्यांना नाटकासाठी प्रोत्साहन देत. एका सरांनी एक संगीत एकांकिका लिहून दिली. ‘गाणारं गाव’ असं काहीतरी तिचं नाव होतं. तिथला राजा अशी आज्ञा देतो, की जे काही बोलायचं ते गाण्यात, रागदारीमधे. मला गाण्याची आवड होती. मी त्यात प्रधानाची भूमिका केली. तो बिरबलासारखा चतुर होता. हमीर, पिलू, मालकंस, यमन, भैरवी इत्यादी रागांमध्ये मी चार-चार ओळी बसवल्या. गाणं शिकलेलो नव्हतो; पण रेडिओ ऐकून मला संगीत थोडं थोडं कळत होतं. ती एकांकिका खूपच गाजली. मित्रांना तर आवडलीच; सगळ्या शिक्षकांनी मुद्दाम भेटून शाबासकी दिली. ऐतिहासिक कपडे, तलवार-ढाली, अन्य साहित्य ‘जाधव नाट्य संसार’ किंवा ‘मॅकड्रप’कडून भाड्यानं आणणं, आणि मेकअप करणाऱ्या माणसाकडून रंगरंगोटी करून घेणं, या फार आवडीच्या गोष्टी होत्या. शिवाय ‘प्रॉम्प्टिंग.’

शालेय जीवनात मी केलेल्या इतर भूमिका म्हणजे शिवाजी महाराज, कलुषा कबजी, भाऊबंदकी नाटकातल्या एका प्रवेशात नमकशास्त्री, एका इंग्रजी नाटिकेत मुलाखती घेणारा कंपनीचा मॅनेजर आणि गो. नी. दांडेकरांचे ‘शितू’ हे पूर्ण नाटक (त्यात एक छोटी भूमिका) इत्यादी इत्यादी. वर्गातला अभ्यास व्यवस्थित सुरू होता. गणित, इंग्रजी, भाषा, विज्ञान हे सगळे विषय चांगले होते. साधारण ६५ ते ७५ टक्के अंतिम परीक्षेत मिळत. गणितात तर १०० पैकी १००. अकरावीला बोर्डाच्या परीक्षेत ७१ टक्के गुण पडले. त्यामुळे माझ्या नाट्यप्रेमाला घरातून विरोध व्हायचं काही कारण नव्हतं. ‘भरत’ची नाटकं बघणं चालूच होतं. त्या वेळी तेवढंच एक नाट्यगृह होतं. मे महिन्याच्या सुट्टीत पेरुगेट भावेस्कूल, नवीन मराठी शाळा, इथे तात्पुरती नाट्यगृहं उभी राहत.

एमईएस कॉलेज, वाळवेकर ट्रॉफी विजेता संघ (प्रेमा तुझा रंग कसा). (बसलेले, डावीकडून) विक्रम गोखले, अशोक काळे, मो. वा. केळकर, जयंत बर्वे, रवींद्र गुर्जर. (मागे उभ्या) रजनी जोशी, सुलोचना अंतुरकर, मंगला राजे.

पुढे एम. ई. एस. कॉलेजमध्ये प्री-डिग्री सायन्सला प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी नाटक वगैरे केलं नाही. मॅटिनीला इंग्रजी चित्रपट बघण्याचा धडाका सुरू झाला. ‘एफवाय’ला वार्षिक स्नेहसंमेलन जवळ आलं. वसंत कानेटकरांचं ‘प्रेमा तुझा रंग कसा’ नाटक बसवायचं ठरलं. १९६५ सालची गोष्ट आहे. तोपर्यंत सगळ्या महाविद्यालयांमधून ‘गॅदरिंग’ चांगलं पार पडत असे. त्यानंतर हुल्लडबाजी सुरू झाली आणि संमेलनं दोन वर्षांनंतर कायमची बंद झाली. तर, माझी त्या नाटकासाठी आधी निवड झालेली नव्हती. निवडलेल्या एका मित्रानं ‘मला अमुकच भूमिका पाहिजे’ म्हणून हट्ट धरला. ‘नाही तर मी संमेलनावर बहिष्कार टाकीन!’ (केवळ विनोद). मग पुन्हा कलाकारांची निवड झाली. मला बच्चाजी बल्लाळची भूमिका मिळाली. नाटक तर प्रसिद्धच आहे. भालबा केळकरांची ‘पीडीए’ संस्था त्याचे प्रयोग करत असे. भालबांचे बंधू खंडेराव केळकर आमच्या कॉलेजात केमिस्ट्रीचे डेमॉन्स्ट्रेटर होते. ते नाटकाचे दिग्दर्शक. बाजीरावाच्या भूमिकेत कोण होतं ठाऊक आहे? विक्रम गोखले! त्याचं ते पहिलं, मोठं, हौशी रंगभूमीवरचं नाटक.

तो महिना-सव्वा महिना फारच आनंदात गेला. संध्याकाळी तालमी असत. बहुतेक वेळा दुपारी मी तासांना दांडीच मारत असे. माझा एक विषय गणित होता. त्याचे प्राध्यापक भट (हे आधीच्या वर्षी प्राचार्यदेखील होते) मी वर्गात हजर असलो की म्हणायचे, ‘When Gurjar is present, all present. No Roll Call!’ असो. नाटक उत्तम बसलं. कधी कधी भालबा स्वत: आम्हाला शिकवायला येत. त्याचाही खूप फायदा झाला. कॉलेजच्या शेजारीच ‘कॅफे पॅरेडाइज’ नावाचं इराणी हॉटेल होतं. रोज तालमीच्या मध्यंतरात तिथे जाऊन सामोसे, केक आणि चहा घेणं, हा नित्यनेम होता. अजूनही ते हॉटेल तिथेच आहे. कधी कधी जुनी आठवण म्हणून मी तिथे जातो. पूर्वीसारखे केक मात्र आता मिळत नाहीत. आमच्या नाटकाचे एकूण पाच प्रयोग झाले. त्यातला एक महाराष्ट्र मंडळाच्या नाट्यगृहात झाला. पुण्यातील सर्व कॉलेजेसच्या संमेलनामध्ये होणाऱ्या सर्वोत्कृष्ट नाटकाला ‘वाळवेकर ट्रॉफी’ मिळत असे; ती आम्हाला मिळाली. कौतुकाचा वर्षाव!

त्यानंतर माझा ‘फ्रंट स्टेज’ किंवा ‘बॅकस्टेज’ वावर नियमितपणे होत होता. पुरुषोत्तम करंडक, यूथ फेस्टिव्हल, पुढच्या वर्षीचं संमेलन आम्ही गाजवलं. रत्नाकर मतकरी आणि विजय तेंडुलकरांच्या एकांकिका त्या काळात केल्या जायच्या. मी मतकरींच्या ‘एका ओल्या रात्री’ या एकांकिकेत डॉक्टरची भूमिका केली होती. त्याला ‘उल्लेखनीय’ म्हणून पारितोषिक मिळालं होतं. बक्षीस मिळणं, न मिळणं ही गोष्ट महत्त्वाची नव्हती. आम्ही (दारू न पिता) कायम धुंदीत असायचो. ‘पुरुषोत्तम’मध्ये बी. जे. मेडिकल कॉलेजचा दबदबा होता. तसा त्यांचा दर्जाही होता. जब्बार पटेलनं बसवलेली आणि काम केलेली तेंडुलकरांची ‘बळी’ ही एकांकिका त्या दरम्यान ‘पुरुषोत्तम’ला पहिली आली. पुढच्या वर्षी आम्ही ती ‘एमईएस’मध्ये केली. मी दुसऱ्या नाटकात काम करत असल्यामुळे त्यात केवळ मदतीसाठी होतो. मजा आली.

त्या सर्व गडबडीत एक वर्ष वाया गेलं. मी बाबा आमट्यांच्याकडे (घरून पळून) गेलो. पुढे ‘सायन्स’च्या ऐवजी गणित घेऊन बी. ए. (बहिस्थ) झालो. तालमी संपवून घरी परत जायला रात्रीचे ११ तरी वाजत; पण मातोश्री कटकट न करता दार उघडत असत. अशा रीतीनं कॉलेजची चार-पाच वर्षं नाटकांत रंगून गेली. विक्रम गोखलेनं १९६६च्या संमेलनात कानिटकरांचं ‘वेड्याचं घर उन्हात’ हे नाटक गाजवलं आणि तो हौशी रंगमंचावरून उड्डाण करून व्यावसायिक प्रवाहात जाऊन मिळाला - आपली स्वत:ची अशी वेगळी प्रतिमा निर्माण केली. पुढे तो फारच मोठा झाला, तरीही आजतागायत आमची मैत्री टिकून आहे. त्याचं कुठलंही नवीन नाटक आलं, की मी (तिकीट काढून) हजर राहतो. आमच्या पाच-१० मिनिटं गप्प होतात. ‘कोण गेलं आणि कोण भेटलं,’ हा विषय त्यात असतोच.

पुढे मीही दोन वर्षं व्यावसायिक नाटक कंपनीत काम करू लागलो. भूमिका छोट्याच होत्या; पण त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याचा प्रवास झाला. त्याची थोडक्यात हकीकत अशी - १९६७ च्या गणपतीपूर्वीचे दिवस. अप्पासाहेब इनामदारांच्या ‘कलासंगम’ या कंपनीचा नाट्यदौरा लवकरच सुरू होणार होता. त्यांचा मुलगा विनोदमूर्ती प्रकाश इनामदार मला ‘भरत नाट्य’पाशी भेटला. मी नाटकात काम करतो, हे त्याला ठाऊक होतं. त्यानं मला विचारलं, ‘अरे आमच्या ‘थांबा थोडं, दामटा घोडं’ या नाटकात दिवेकर गुरुजी भटजीची भूमिका करायचे. ते आजारी पडल्यामुळे आम्ही दुसऱ्या कलाकराच्या शोधात आहोत. तू करशील का काम? वाक्यं फार नाहीत.’ मी तर अशा संधीच्या शोधातच नेहमी असायचो. लगेच ‘हो’ म्हणालो आणि एका आठवड्याच्या आत कंपनीच्या स्वत:च्या गाडीने प्रवासाला निघालोसुद्धा. मला वाटतं, त्या गणपतीत आमचे सहा-सात प्रयोग झाले.

त्यांचं कलापथकही होतं. गोव्याच्या दौऱ्यात मी ‘मावशी’चं कामदेखील केलं. त्यानंतर ज्ञानेश्वर-मुक्ताबाईच्या जीवनावरील ‘चला आळंदीला’ हे नाटक बसवण्यात आलं. मला त्यात एका वारकऱ्याचं किरकोळ काम होतं. परंतु दौऱ्याची व्यवस्था बघण्याची काही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. एकूण दोन वर्षं मी त्यांच्याबरोबर फिरलो. फार मोठा आनंदाचा कालखंड! मला मिळालेली एका प्रयोगाची जास्तीत जास्त ‘नाइट’ किती होती सांगू? पन्नास रुपये! म्हणजे महिन्याला १० प्रयोग झाले, तर ५०० रुपये. जेवणखाण, मुक्काम हा खर्च अर्थातच कंपनीचा.

‘कलासंगम’मधे जाताना शिक्षण अर्धवट राहिलेलं होतं. दोन वर्षांनंतर ते पुन्हा सुरू केलं आणि गणित घेऊन बीए झालो. नाट्य-कारकीर्द जवळजवळ संपली आणि लेखन सुरू झालं. मी दोन चित्रपटांत (किरकोळ) भूमिका केल्या, त्याची गोष्ट आता पाहू.

१९५६मध्ये सहावीत असताना ‘प्रभात स्टुडिओ’नं ‘गजगौरी’ नावाचा (हिंदी) अखेरचा चित्रपट काढला. कौरव मंडळी गजगौरीचं व्रत मोठ्या धूमधडाक्यात करतात; पांडवांना हिणवतात. त्यामुळे भीम स्वर्गात जाऊन प्रत्यक्ष ऐरावतालाच खाली घेऊन येतो आणि कुंती आपल्या मुलांसह त्याची साग्रसंगीत पूजा करते, असं ते कथानक होतं. कुंतीच काम रत्नमालानं (दादा कोंडकेची चित्रपटांमधील आई) केलं होतं. द्रोणाचार्य होते नाना पळशीकर. बाकी पाच (लहान) पांडव आणि दुर्योधनासह २०-२५ कौरव. त्यातला एक कौरव मी होतो. जोडीला, ‘प्रवासी डायरी’ काढणारा आणि ‘मेलडी मेकर्स’चा निवेदक जयंत जोशी होता. आम्ही दोघांनी काही वर्षे अनेक उचापती केल्या.

टिळक रोडवर, महाराष्ट्र मंडळापाशी स्टुडिओचा ट्रक सकाळी आठच्या सुमारास यायचा. त्यात आम्ही २०-२५ जण बसून ‘प्रभात’ला जायचो. मग मेकअप, केसांचा विग बसवणे यात थोडा वेळ जायचा. नंतर शूटिंग. तिथल्या तळ्याकाठी, पूर्वेकडे तोंड करून एक गाणं - सकाळची प्रार्थना - चित्रित झाली. ‘जय आर्यदेवता, जय सूर्यदेवता...’ असे त्याचे शब्द होते. दुपारच्या वेळी जेवायला (कच्च्या) पोळ्या, बटाट्याची सुकी भाजी असे. आम्हाला ते ‘श्रेयस’सारखं गोड लागायचं. संध्याकाळी पुन्हा ट्रकनं टिळक रोडवर परत. हा कार्यक्रम १-१॥ महिना चालला. अर्थातच शाळेला दांड्या! काही वेळा, शूटिंग नसलं, तरी आम्ही तळ्यातल्या गणपतीला (आताची सारसबाग) जाऊन दिवस काढायचो आणि संध्याकाळी घरी परत यायचो. शाळेतले गुरुजी म्हणायचे, की ‘शाळा सोडा आणि सिनेमातच जा!’ पण तसं काही झालं नाही. अभ्यास व्यवस्थित होत होता. पुढे मी विगसारखे केस भरपूर वाढवले. सुदैवानं अजूनही ते टिकून आहेत; पण ते पाहून कोणी मला काही काम दिलं नाही. जाणारे-येणारे लोक, काही वेळा खाली वाकूनही, नमस्कार करतात, एवढंच. 

दुसऱ्या सिनेमाची गंमतच झाली. जून २००६मध्ये फेसबुकवर ‘फ्रेंड’ असलेल्या एका रंगकर्मी मुलीचा फोन आला. ती म्हणाली, ‘एका मराठी चित्रपटात छोटीशी भूमिका आहे. तुम्ही कराल का? म्हणजे तुमचा मोबाइल क्रमांक त्या निर्मात्याला देते.’ मी कशाला नाही म्हणू! नंतर श्याम माहेश्वरी नावाच्या निर्माता-दिग्दर्शकाचा फोन आला. हे ‘सास भी कभी बहू थी’सारख्या अनेक मालिकांच्या निर्मितीत सहभागी होते. ‘एम. एस. धोनी’च्या पटकथेचा काही भागही त्यांनी लिहिला होता. नव्या चित्रपटात कबड्डी कोच असलेल्या गुरुजींची छोटी भूमिका होती. व्यवहार ठरला. निम्मे पैसे खात्यावर लगेच जमा झाले. पूर्ण प्रोफेशनल व्यक्ती होती. ‘चरणदास चोर’ असं चित्रपटाचं नाव होतं. सगळे कलाकार नवीन होते. 

मला एक महिन्यासाठी दुबईला मुलीकडे जायचं होतं; पण शूटिंग ऑक्टोबरमध्ये चिपळूणजवळ होणार होतं. माझं काम एक किंवा फार तर दोन दिवसांचं होतं. ठरल्याप्रमाणे ‘परशुराम’क्षेत्री चित्रीकरण झालं. एकच दिवस, पण सकाळी नऊ ते रात्री १० असं काम चाललं. माझं एकूण काम चार-पाच मिनिटांचं होतं. कबड्डीची दोन संघांत खरीखुरी मॅच झाली. प्रत्यक्ष मैदानावर कुठल्याही खेळात मी वावरलो नसलो, तरी इथे कबड्डीचा मार्गदर्शक झालो! ‘दुरून डोंगर साजरे’ या म्हणीप्रमाणे शूटिंगची गोष्ट आहे. दिवसभर काम करताना घाम फुटतो आणि पिट्टा पडतो; पण सगळं काही व्यवस्थित पार पडलं. जेवणखाण करून रात्री ११ वाजता आलिशान हॉटेलमध्ये परतलो. दुसऱ्या दिवशी चिपळूणमधे काही जणांना भेटून पुण्याला परतलो. राहिलेले पैसे आणि प्रवासखर्च तत्परतेनं मिळाला. बऱ्यापैकी लाभ झाला. वास्तविक, काहीही मानधन न देता नुसताच खर्च केला असता तरी चाललं असतं. एडिटिंग, डबिंग वगैरे होऊन, कलाकारांसाठी सांताक्रूझला ‘चोरा’चा खास ‘शो’ झाला. पुढे चित्रपट प्रदर्शित झाला, त्या वेळी मी नेमका दिल्लीत होतो. त्याच आठवड्यात ‘ती’ भीमा-कोरेगावची दंगल झाली. (इतर अनेक चित्रपटांप्रमाणे) ‘चरणदास चोर’ पुण्यात एक आठवडा चालला. अद्याप तो दूरदर्शनवर आलेला नाही. ही झाली दुसऱ्या चित्रपटाची कथा. अशा रीतीनं मी ‘बॉलिवूड’ गाजवलेलं आहे!

फेब्रुवारी २०१७मध्ये मी पटकथा लेखनाचा एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण केला. आमचे शिक्षक माझे वाचक होते. ‘अहो, तुमच्या ‘पॅपिलॉन,’ ‘गॉडफादर’च्या अनुवादांचा उल्लेख आम्ही नेहमी वर्गात करतो,’ असं ते म्हणाले. आपला परिचय करून देताना मी असं म्हणालो, की ‘या क्षेत्रात कित्येक वर्षांपूर्वी येण्याची माझी इच्छा होती; पण ती प्रत्यक्षात आली नाही. त्यामुळे चित्रपट क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालं आहे!’

या वर्षी शॉर्ट फिल्म, वेब सीरिज, दीर्घ पटकथा लिहिणे या दिशेनं माझं काम सुरू आहे. ‘Theory of Everything’ या नावाची एक अगदी छोटी फिल्म बनवली. कथा-पटकथाकार आणि प्रत्यक्ष (लहान-मोठ्या) पडद्यावरसुद्धा मी तुम्हाला लवकरच दिसेन, अशी ग्वाही या लेखाच्या निमित्ताने देतो. तेव्हा सावध!

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZQTBT
Similar Posts
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
१८ वर्षांच्या चिन्मयने लिहिलेले उत्तम नाटक - संगीत चंद्रप्रिया ‘संगीत चंद्रप्रिया’ हे नाटक नुकतेच रंगभूमीवर आले असून, ते चिन्मय किरण मोघे या अवघ्या १८ वर्षांच्या प्रतिभासंपन्न तरुणाने लिहिले आहे. सर्वार्थाने उत्तम अनुभव देणाऱ्या या नाटकाबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
माझं घर ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत, लहानपणापासून आजतागायत त्यांचं ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य झालं, त्या घरांबद्दल...
यशस्वी चित्रपटांचे निकष ‘पटकथा लेखनाचा अभ्यास करताना मी गेल्या ८० वर्षांतल्या गाजलेल्या आणि मी पाहिलेल्या सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language